भारताचं राज – वैभव लेखांक ४८
मीरा डॉ. रमा
गोळवलकर
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सर्वात गूढ, अनाकलनीय दंतकथा वाटावी, म्हणूनच
सर्वसामान्यांना भावणारी, त्यांच्या भावविश्वात अढळ पद मिळवणारी अशी अद्भुत
व्यक्तिरेखा म्हणजे चित्तोड साम्राज्याच्या सिसोदिया राजघराण्याची महाराणी मीरा!
मधुराभक्तीच्या चर्मोत्कर्ष बिंदूचा मान मिळवलेली ही राज्ञी, संत कवयित्री म्हणून
जगप्रसिद्ध आहे. तिच्या विषयीच्या अनेक कथा आजही कृष्णभक्तांच्या ओठी आहेत. तिची
कवनं विविध पद्धतीच्या कीर्तन – भजनांचा अविभाज्य घटक आहेत. श्रीकृष्ण भक्त
संप्रदायाच्या भक्तांना संत मीराबाई या नावाचं गारुड आहे. हे सारं असलं तरी तिची जीवन
गाथा सुरू होते राजस्थानमधल्या पालीच्या कुडकी गावातून. मेडतिया राठोड राजवंशाच्या
दूदाजी राठोडांच्या चौथ्या मुलाची रतनसिंहाची ही एकुलती एक कन्या. वर्ष होतं इ.स.
१४९८. योग्य मुहूर्तावर तिचं बारसं करून तिला नाव देण्यात आलं जशोदा राव रतनसिंह
राठोड! पण या नावानं तिला हाक मात्र कोणीच मारली नाही. ती सगळ्यांची लाडकी
‘मीरा’ होती.
ती दोन वर्षांची असतानाच मातेचा मृत्यू झाला अशी नोंद आहे. त्यामुळे, आजोबा दूदासिंह
तिला मेडता गावी घेऊन आले. राजकुमारी म्हणून लहानाची मोठी होताना तिच्या
शिक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी त्यांच्या देखरेखीखाली इतर राजस्त्रियांनी पार
पाडली. असं सांगतात की बालिका असताना वाड्या समोरून जाणारी वरात बघून तिनं
आपल्या संगोपन करणाऱ्या दायीला विचारलं, ‘माझा पती कोण आहे?’ त्यावर दायीनं
तिला मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर उभं केलं आणि हाच तुझा पती आहे अशी समजूत
घातली.
त्या एका वाक्यानं तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मुरलीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीलाच
तिनं आपलं सर्वस्व मानलं. उपवर झाल्यानंतर तिचा विवाह चित्तोडच्या सिसोदिया
राजवंशाच्या राणा सांगांचा पुत्र भोजशी लावून देण्यात आला. पण सर्वसामान्य
लोकांसारखा संसार करण्यात मीराला काडीची रुची नव्हती. ती तिच्या भक्तीच्या संसारात
मग्न होती.
सिसोदिया राजघरणं शाक्त संप्रदायाचा अवलंब करणारं तर मीरा कृष्णभक्तीत तल्लीन. तिनं
राजा भोजला आपला पती देखील मानलं नाही कारण तिच्यालेखी तिचा पती म्हणजे तिचा
मुरलीधरच होता. विवाहानंतर सासरी येताना तिनं आपल्या बरोबर मुरलीधराची
मूर्तीदेखील आणली होती. त्या मूर्तीकरता राजा भोजसिंहांनी बांधून दिलेल्या मंदिरातच
तिचं वास्तव्य होतं. तिथेच ती भजन गायची आणि भावविभोर होऊन नृत्य करायची.
या सगळ्या वागण्यामुळे तिनं सासरच्या मंडळींचा रोष ओढावून घेतला. सासू, नणंद आणि
लहान दीर तिघांना तिचं कृष्णप्रेम मान्य नव्हतं. परंपरागत वैवाहिक आयुष्याला दूर सारत
कृष्णभक्ती करण्यात व्यग्र असलेल्या मीरेचा संघर्ष सुरूच राहिला आणि एक दिवस भोज
राजाचा मृत्यू झाला.
त्याच्या प्रेतासोबत हिनं सती जावं म्हणूनही तिच्यावर बळजबरी करण्यात आली पण ती
बधली नाही. त्या काळाच्या प्रथेविरुद्ध वागत ती स्वत:ला सधवाच म्हणून घेत असे. तिनं
तिचे सौभाग्यालंकारदेखील काढून ठेवले नाहीत. तिच्या दैनंदिन जीवनात काडीचाही बदल
न करता ती जीवन जगत होती. कृष्णभक्तीची अभिव्यक्ती आपल्या काव्यातून करण्यात
तिचा बहुतांश वेळ जाई.
या सगळ्या विद्रोही वागण्याला आळा घालण्यासाठी तिच्या सासू – नणंद आणि
भोजसिंहांच्या मृत्यूनंतर राजसिंहासनावर बसलेल्या दिरानं विविध प्रकारे तिला छळण्याचा
चंगच बांधला. या सगळ्यावर उतारा म्हणून तिनं भजनं गायली. त्यात या सगळ्याचा पाढा
वाचला. कधी तिच्या हाराच्या टोपलीत विषारी सर्प ठेवण्यात आला, तर कधी विष
लावलेल्या टोकदार खिळ्यांवर झोपवण्यात आलं. कधी कोंडून उपाशी ठेवण्यात आलं तर
कधी मारहाणही करण्यात आली. त्या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेल्या मीराबाईला
अखेर राजानं भर राजसभेत एखाद्या अपराध्यासारखं उभं करून सर्वांसमोर विष प्राशन
करण्याची शिक्षाच ठोठावली.
त्या विषाचाही तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. पण या प्रसंगानंतर मात्र तिनं
सौभाग्यलेण्यांसह भगव्या परीधानात मुरलीधरासह चित्तोडगढचा अभेद्य दिंडी दरवाजा
ओलांडला आणि ती पायथ्याशी वसलेल्या सामान्य लोकांत येऊन राहिली. तिथे
राजघराण्यांची सारी बंधनं जुगारून देत, सर्वसामान्य प्रजेच्या घोळक्यांत तिचा
कृष्णभक्तीचा उत्सव अखंड होता. विषाचा परिणाम होत नाही हा एक चमत्कारच होता पण
त्याहूनही मोठा चमत्कार होता तो म्हणजे सम्राज्ञी सर्वसामान्यांत मिसळते आणि
त्यांच्यातलीच होऊन राहते. तिच्यातलं दिव्यत्व जाणवलं नाही तरच नवल.
त्या प्रसंगाचं वर्णन करताना मीराबाई लिहून जातात – ‘गढ़ से तो मीराबाई उतरी, करवा ले
नु साथ | गाँव को छोड्यों मीरा मेढ, तो पुष्कर न्हावा जाये ||’ यात करवा या शब्दावर तिनं
श्लेष साधला आहे. करवा या शब्दाचा एक अर्थ काळा म्हणजेच सावळा अर्थात कृष्ण होतो
तर दुसरा अर्थ तोटी असलेला मातीचा लहान घडा किंवा कमंडलू. तिनं जेव्हा आपलं सासर
सोडलं त्यावेळी तिच्या हाती काय होतं तर मुरलीधर आणि एक मातीचा घडा. मेढता गाव
म्हणजे माहेरचाही मोह सोडला आणि आता ती पुष्करच्या दिशेनं निघाली आहे.
राजस्थान मधलं पुष्कर सरोवर आणि क्षेत्र श्राद्धकर्म करण्यासाठी उत्तम असल्याचा निर्वाळा
आपल्या पुराणांत दिलेला आहे. त्यामुळे मीराबाई पुष्करला निघाली आहे याचा अर्थ तिथे
जाऊन स्नान करून तिनं स्वत:चं श्राद्ध केलं असावं . कारण त्याशिवाय संन्यास घेता येणार
नाही. त्यामुळे या भजनात तिला आपलं माहेर सासर आठवतं. पूर्वायुष्यात काय काय घडून
गेलं याकडे तटस्थपणे बघत ती पुष्करच्या दिशेनं वाटचाल करते आहे. ऐश्वर्यात लोळलेली,
लाडाकोडात वाढलेली, राजकन्या म्हणून मिरवलेली, राणी म्हणून वावरलेली मीरा
दुसऱ्यांदा आपलं घर सोडतेय. तिच्या मनात उसळलेला भावनांचा डोंब या भजनात स्पष्टच
दिसतो. इथून खऱ्या अर्थानं तिच्यातली संन्यस्त वृत्ती प्रकटली आणि तिचा आध्यात्मिक
प्रवास सुरू झाला. साधू संतांच्या आणि ज्ञानी लोकांच्या संगतीत ती पुढे पुढेच जात राहिली.
त्यानंतर उत्तरप्रदेशात केलेल्या प्रवासात तिला वाराणसीस्थित रविदास महाराज (१३७७ –
१५२८) या सत्पुरुषांचा अनुग्रह प्राप्त झाला. रामनामाचं धन मिळाल्याचा अनिर्वचनीय
आनंद ती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करते – ‘पायो जी मैंने राम रतन धन पायो| वस्तु
अमोलिक दी म्हारा सत्गुरू | किरपा कर अपनायो ||’
मथुरा, गोकुळ – वृंदावन या सर्व लीला क्षेत्रात फिरून आपल्या पतीच्या म्हणजेच मुरलीधर
कृष्णाच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत ती मनमुराद भटकली. तो सगळा अनुभव शब्दबद्ध
करत गेली. सगळी आस होती ती आपल्या पतीला प्राप्त करण्याची. यातूनच ‘श्याम मने
चाकर राखो जी, गिरधारीलाल माने चाकर राखों जी || चाकर रहसूं बाग लगासूं नित उठ
दरसण पासूं। बृंदावन की कुंज गलिन में तेरी लीला गांसू ।।’ आणि ‘मेरे तो गिरिधर गोपाल
दूसरो ना कोई | जाके सर मोरमुकुट मेरो पती सोई ||’ यासारखी भावनेनं ओथंबलेली भजनं
प्रसवली गेली.
त्याच्या प्रेमाच्या उदात्त भावनेत आकंठ बुडलेल्या त्या प्रेमरागिणीला भक्तीच्या क्षेत्रात
आपसूकच प्रवेश मिळाला. काव्याला अध्यात्माची झळाळली प्राप्त झाली आणि त्यातला
गोडवा अधिकच वाढला. ‘रामनाम रस पीजे मनवा | तज कुसंग सत्संग बैठी नित, हरि चर्चा
सुनि लीजे | काम क्रोध मद लोभ मोह को, चित से बहाय दीजे | मीरा के प्रभू गिरीधर
नागर, ताहि के रंग में भीजे |’
हरिरसात चिंब भिजलेली मीरा विरक्तीची एक एक पायरी चढत होती तसा तिचा मार्ग
अधिकच प्रशस्त होत होता. उत्तर भारतातून पावलं गुजराथच्या दिशेनं वळली ती
द्वारकाधीशाच्या ओढीनं. या महान भक्त कवयित्रीनं इहलोकीची यात्रा संपवली ती
द्वारकाधीशाच्या मंदिरातच.
असं म्हणतात की द्वारकाधीशाच्या मूर्तीसमोर मीरा मंत्रमुग्ध होऊन उभी होती. तिचा
कृष्णध्यास इतका पराकोटीचा होता की प्रभासपाटणला समुद्र किनारी वृक्षाच्या छायेत
पहुडलेल्या श्रीकृष्णाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला व्याधाचा बाण लागून झालेल्या
जखमेची वेदना तिला जाणवली. त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला वेदनाशमन
करणाऱ्या औषधीयुक्त चंदनाचा लेप लावण्यासाठी मीराबाई मूर्तीच्या जवळ गेली. बोटावर
लेप घेऊन ती तो मूर्तीच्या अंगठ्याला लावत होती आणि त्याच वेळी तिची प्राणज्योत मूर्तीत
विलीन झाली. ते वर्ष होतं इ.स. १५४७.
एकोणपन्नास वर्षाचं द्वैत निमालं आणि महाराणी मीरा आपल्या पतीच्या अथांग, अविनाशी,
अविकारी, आनंदमय, अद्वैत तत्त्वात विलीन झाली. एका प्रतिभासंपन्न राजकुलीन
कवयित्रीचा हा अद्भुत, विस्मयकारक जीवनपट भारतीय संस्कृतीच्या दिव्यत्वाची प्रचीती
आजही देत आहे.
No comments:
Post a Comment