Wednesday, March 1, 2023

रमा 18वे शतक मुद्दूपळणी व तिचे काव्य राधिका सांत्वनम्

 भारताचं राज – वैभव लेखांक ५०

मुद्दुपळणी

 डॉ. रमा गोळवलकर

मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा धांडोळा घेताना एका ठिकाणी आपण थबकतो. इ.स.

१६७६ च्या युद्धात व्यंकोजी उपाख्य एकोजी शहाजी भोसल्यांची तलवार गाजली आणि

त्यांनी तंजावूरच्या नायकांचा पराभव केला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ.

म्हणजे पराक्रमी शहाजीराजे भोसल्यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाईंचे चिरंजीव. इकडे महाराष्ट्र

आणि उत्तर भारतात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापनाच्या कार्यात गुंतले

असतानाच, एकोजीराजे दक्षिण भारत गाजवत होते. एकाच पित्याच्या पोटी दोन स्वतंत्र

आणि सामर्थ्यशाली राजे जन्मावे हे भाग्य आपल्या महाराष्ट्रभूमीला लाभलेलं आहे.

तंजावूरच्या मराठी साम्राज्याचा इतिहास अतिशय काटेकोरपणे सरस्वती महाल या

ग्रंथागारात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. ही सारी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे

एकोजीराजे (राज्यकाळ १६७६ ते १६९९) यांनी तेलुगु भाषेत रामायण कथा लिहिल्याचा

उल्लेख त्यांच्या तमिळ चरित्रात येतो. त्यांच्या वंशात शाहूजी राजे (राज्यकाळ १६८४ –

१७१२), सरफोजीराजे प्रथम (रा. १७१२ – १७२८), तुकोजीराजे (रा. १७२८ –

१७३६), एकोजी / व्यंकोजी द्वितीय (रा. १७३६ – १७३७), सुजनाबाई राणीसाहेब (रा.

१७३७ – १७३८), सरफोजीराजे प्रथमचे अनौरस पुत्र म्हणून प्रतापसिंहराजेंना गादीपासून

दूर ठेवत शाहूजीराजे द्वितीय (रा. १७३८ – १७३९) राजे झालेत. १७३६ ते १३९ ही तीन

वर्षं राज्यात प्रचंड अनागोंदी माजली. शेवटी शाहूजी राजांनी पायउतार होत राजे

प्रतापसिंहांना राज्य देऊन टाकलं.

मिळालेल्या संधीचं सोनं करत त्यांनी इ.स.१७३९ ते १७६३ ही चोवीस वर्षं तंजावूरच्या

मराठा साम्राज्यावर राज्य केलं. त्याचा चहूबाजूंनी विस्तार केला आणि तंजावूर मराठा

साम्राज्य अधिक मोठं, बलाढ्य आणि समृद्ध केलं. तर आजची आपली कवयित्री आहे ती या

प्रतापसिंह राजांच्या राणीवशात समाविष्ट असलेली मुद्दूपळणी.

अंदाजे इ.स. १७५० मध्ये, नागवाश्रम (जि. अनकापल्ली, आंध्रप्रदेश) नावाच्या गावी, एका

तेलुगु देवदासीच्या पोटी जन्मलेली मुद्दूपळणी तंजावूर राजदरबारातली एक कलावती

म्हणून सेवा देत होती. तिचं सौंदर्य, चातुर्य, कवित्व, गायन आणि नर्तन या सगळ्याची

भुरळ गुणग्राही प्रतापसिंहांना पडली नसती तरच नवल. ते स्वत:ही एका देवदासीच्याच

पोटी जन्माला आलेले असल्यामुळे त्यांना मुद्दूपळणीच्या व्यवसायाचं वावडं नसावं. त्यांची

आवडती राणी म्हणून वावरताना तिनं तंजावूरच्या कलाजीवनाला अधिक सकस, समृद्ध

आणि संपन्न केलं.


भारतीय संस्कृतीत आराध्य देवतेचं पूजन दोन प्रकारे करण्याची परंपरा आहे. देवाच्या

मूर्तीवर अभिषेकादि षोडशोपचार म्हणजे अंगभोग आणि देवतेच्या मनोरंजनासाठी म्हणून

प्रस्तुत करण्याच्या निष्पादित कला (पर्फोरमिंग आर्ट्स) म्हणजे रंगभोग. त्याकरता या कला

सादर करण्यासाठी लहानपणीच प्रतिभावंत बालक बालिकांना हेरून त्यांना या कलांचं

प्रशिक्षण देण्यात येई. एकाहून एक उत्तमोत्तम कलावंत आणि कलावती या देशात होऊन गेले

ज्यांनी अतिशय तन्मयतेनं आणि निष्ठेनं आपलं सर्वस्व या कलांच्या प्रस्तुतीकरणासाठी

पणाला लावलं. देवतांच्या मनोरंजनाकरता प्रस्तुत करायच्या उदात्त हेतूनं या कलांचा उदंड

विकास या देशात झाला.

काळाच्या ओघात इस्लामी आक्रमणानंतर या प्रथांत अंधश्रद्धा वाढल्या, प्रदूषण आलं, ऱ्हास

झाला, यात दुमत नाही. पण भारतात जितक्या विविध प्रकारच्या लोककला आणि

लोकसंगीत नृत्या सोबतच विविध प्रकारची शास्त्रीय संगीत आणि नृत्यांचे प्रकार आहेत

तितक्या अन्यत्र कुठेच नाहीत. त्या मागचं मुख्य कारण म्हणजे त्यांना मिळालेला संपन्न

मंदिरांचा आणि राजसभांचा आश्रय! त्यामुळे नंतरच्या काळात देवदासीसारख्या प्रथांच्या

माध्यमातून स्त्रियांचं शोषण होत असलं तरी मुळात या कलावतींना समाजात अतिशय मान

होता. या सर्व कलावंत मंडळींनी परंपरेनं या निष्पादित कला जीवापाड जपलेल्या.

या पार्श्वभूमीचा संदर्भ ध्यान घेऊन मुद्दूपळणीचं सुरुवातीचं प्राशिक्षण देवांचा रंगभोग

करणाऱ्या मनोरंजन कलावती म्हणजे देवदासी म्हणून झालं. विविध तालात – लयीत,

विविध रागरागिण्यांच्या आविष्कारात लालित्यपूर्ण पदन्यास, हस्तमुद्रा, भागभंगिमा प्रस्तुत

करण्यात ती निष्णात झालीच. त्याशिवाय तेलुगु, संस्कृत आणि तमिळ या तीन भाषांत

काव्यशास्त्राच्या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करत काव्यरचना करण्यात ती पारंगत

होती. गायन आणि वाद्यवादनात तिनं विशेष प्राविण्य मिळवलं होतं. शास्त्रार्थ आणि

वादविवाद करण्यात तिची स्पर्धा कोणीही करू शकत नसे. आणि गणित हे तिचा अत्यंत

आवडता विषय होता. हे सारं रसायनच अजब होतं. तिनं अनेक ‘अष्टावधानी’ प्रदर्शनात

भाग घेत रसिक विद्वानांना तिच्या तीक्ष्ण आणि तेजस्वी बुद्धिमत्तेचा प्रत्यय दिला.

त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तिनं रचलेलं शृंगार रसप्रधान तेलुगु काव्य

‘राधिका सांत्वनम्’ अर्थात ‘राधेची मनधरणी’. श्री कृष्ण आणि राधा यांच्या निर्व्याज,

निस्सीम, निश्चल प्रेमाचं एक अलौकिक संमोहन भारतीय कवीला असतंच असतं.

मुद्दूपळणी सारखी विदुषीही त्याला अपवाद कशी असेल? त्यात ती नृत्यांगना, गायिका

आणि अभिनेत्री असल्यामुळे शृंगाररस प्रधानता हे तिच्या सगळ्याच अभिव्यक्तीचा केंद्रबिंदू

होता.

नवयौवन प्राप्त झालेल्या मुद्दूपळणीनं कृष्णभक्तीत नादावलेल्या राधिकेशी अधिक जवळीक

साधत लिहिलेलं हे काव्य. श्रीकृष्णानं इला नावाच्या तरुणीशी विवाह केला आणि राधेचा

मत्सर उफाळून आला या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित हे काव्य म्हणजे अनेकानेक


अलंकार, शब्द चमत्कृती आणि अर्थवाही काव्य पंक्तींचा समुच्चय आहे असं अभ्यासक

म्हणतात. अंदाजे इ.स. १७५७ ते १७६३ या कालखंडात रचण्यात आलेलं हे काव्य

प्रतापसिंहराजे भोसले यांच्या राजसभेत नृत्यनाटिका म्हणून प्रस्तुत करण्यासाठी रचण्यात

आलं होतं. त्यामुळे त्यात अनेक नाट्यपूर्ण प्रसंगाची मालिका आहे.

एकूण चार सर्ग असलेल्या या काव्यात पाचशे चौऱ्यांशी शृंगाररसप्रधान कविता आहेत. त्या

काळात प्रसिद्ध असलेल्या संस्कृत कवी आणि क्षेत्रय्या, श्रीकामेश्वर सारख्या तेलुगु – तमिळ

कवींच्या काव्यशैलीचा सुखोल अभ्यास करून मगच कवयित्रीनं या कामाला हात लावला हे

स्पष्टच जाणवतं.

प्राचीन भारतीय विद्वानांपैकी दोन अतिबुद्धिवान व्यास पुत्र महर्षी शुक आणि तत्त्वचिंतक

राजा जनक यांच्यात होणाऱ्या संवादापासून या काव्याची सुरुवात होते. या दोघांच्या

चर्चेचा विषय आहे शृंगारक्रियेत स्त्री पुढाकार घेते का आणि घेते तर कशी? त्या अनुषंगानं

एक कथा येते. कृष्णाची काकी असलेल्या राधेनं लालन पालन करून वाढवलेल्या इला

नावाच्या तरुणीचा विवाह कृष्णाशी करून दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहितेनं

आपल्या पतीला कसा प्रतिसाद द्यावा आणि पतीनं तिला कसं हळुवार फुलवत न्यावं याची

सविस्तर शिकवणी राधा कृष्ण आणि इलेला देते.

हे सारं सांगत असताना आता कृष्ण इलेचा झाला आणि त्याच्यावरचा आपल्या प्रेमाचा

अधिकार गळून पडला याची जाणीव तिला आतून पोखरू लागते. तो समोर आहे, असणार

आहे पण तो तिचा नसणार ही विरहवेदना तिला असह्य होते. तिचा त्याग केला म्हणून

तिचा त्रागा होऊ लागतो. आणि एका क्षणी ती कोसळते. तिच्या भावनेचा बांध फुटतो. ती

कृष्णाला दूषणं देऊ लागते. त्यावर अतिशय हळुवारपणे कृष्ण तिची समजूत घालतो. अत्यंत

प्रेमानं आपल्या बाहूत भरून घेत तिला शांत करतो. म्हणून या काव्याचं नाव आहे ‘राधिका

सांत्वना’.

मध्ययुगीन तेलुगु भाषेत रचलेलं हे अतिशय धाडसी आणि वेगळ्या धाटणीचं काव्य म्हणून

तेलुगु साहित्याचा इतिहास अभ्यासणारे ओळखतात. एक स्त्री एका पुरुषोत्तमाविषयी तिला

वाटणारी आसक्ती दाबून टाकत नाही. उलट अतिशय धीटपणे तिच्या मनात उत्पन्न

होणाऱ्या नाजूक भावना त्याच्याजवळ व्यक्त करते. त्या आसक्तीचं पर्यवसान म्हणजे स्त्री

सुलभ लज्जा दूर सारत अतिशय आत्मविश्वासानं ती शृंगारक्रीडेत पुढाकार घेते. हे अतिशय

नाविन्यपूर्ण कथाबीज आणि त्यातून बहरलेली ही काव्यलता त्या काळात अभूतपूर्व होती.

हे सारं इतकं अद्भुत होतं की त्या काळात लिहिल्या गेलेल्या तेलुगु काव्यांतला मुकुटमणी

असल्याची साक्ष तेलुगु साहित्याचे तज्ज्ञ म्हणतात. पण भाषिक मर्यादांमुळे याचा

आंध्रप्रदेशाबाहेर फारसा प्रसार झाला नाही. नंतरच्या काळातल्या संकुचित

विचारसरणीमुळे त्यात असलेल्या शृंगार क्रीडेच्या उन्मुक्त वर्णनामुळे या काव्याकडे


तिरस्कारानं पाहिलं जाऊ लागलं. पण चार्ल्स फिलीप ब्राऊन नावाच्या ब्रिटीश अधिकाऱ्यानं

इ.स.१८८७ मध्ये या काव्याची छापील प्रत प्रसिद्ध केली. अर्थात हे करत असताना त्यानं

पैदिपती वेंकटनरसू नावाच्या तेलुगु विद्वानाच्या मदतीनं त्यातल्या त्याला आक्षेपार्ह

वाटणाऱ्या ओळी / कविता गाळून टाकत तळटिपांसह त्याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध

करण्यात आली. ती लवकरच संपली म्हणून १९०७ मध्ये दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली.

इ.स. १९१० मध्ये मात्र बंगलोर नागरत्नम्मा नावाच्या एका वारांगनेच्या हाती हे संपूर्ण

काव्य लागलं. तिनं ते जसं आहे तसंच छापून नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली. पण त्या काळाच्या

संकुचित इंग्रजी विचारसरणीला अनुसरून ब्रिटीश सरकारनं त्यावर बंदी टाकली. हे पुस्तक

प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेच्या इतर आठ पुस्तकांवरदेखील ती लागू करण्यात आली.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कितीतरी दशकं ही बंदी कायम होती.

आठव्या शतकात होऊन गेलेल्या तमिळ कवयित्री अंडाळच्या कृष्णभक्तीच्या शृंगारिक

कविता ‘तिरूपावै’ हा मुधुरा भक्ती चळवळीचा आरंभ होता. तर बाराव्या शतकात होऊन

गेलेल्या ओडिया कवी जयदेवांची संस्कृत गीत गोविंद हा अष्टपदी काव्य प्रकार म्हणजे मधुरा

भक्तीचा चरमोत्कर्ष बिंदू होता. या दोन्ही काव्याचे तेलुगु अनुवाद मुद्दूपळणी राणीनं

केल्याचीही नोंद आहे. शिवाय अष्टपदीसारखीच सप्तपदलु म्हणजे सात ओळींची कविता हा

नवा काव्यप्रकारही आविष्कृत केल्याचा उल्लेख आहे. पण दुर्दैवानं यापैकी काहीच आज

उपलब्ध नाही. ‘राधिका सांत्वनम्’ चा तमिळ अनुवाद मात्र दिल्ली विद्यापीठातील डी. उमा

देवींनी तर इंग्रजी अनुवाद संध्या मुलचंदानी यांनी केला आहे.

No comments: