From: Sadanand Joshi <jsadanand@gmail.com>
माझा मामेभाऊ शिक्षणासाठी लंडन येथे आहे. त्याने शब्दबद्ध केलेली पोस्ट :
दि. २६ फेब्रुवारी १९६६, भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक हिंदूंच्यासाठी जगण्यास कठीण गेलेला दिवस. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव सावरकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथी निमित्त थोडंसं जे काही वाचलंय, ऐकलंय आणि आज मी स्वतः लंडनमध्ये जे अनुभवलंय ते मांडण्याचा एक छोटा प्रयत्न. सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस साष्टांग दंडवत
भारतात असताना सावरकरांचं साहित्य वाचण्याचा फार कमी योग आला पण इकडे लंडनला आल्यावर मी खऱ्या अर्थाने सावरकर वाचायला लागलो, समजायला लागलो आणि त्यावरून एक मात्र नक्की जाणवलं कि त्यांनी जी काही तत्त्व मांडली आहेत ती आपण आज सुद्धा अवलंबू शकतोय. मला इंग्लंडला येऊन तसे आता ५ महिने होत आले पण मनात कायम एक भीती असायची कि परका देश, सगळा शून्यातून जम बसवायचा आणि त्यात ब्रिटिश लोकांच्या मनात असलेला भारतीय लोकांबद्दलचा काहीअंशी द्वेष (जो आता फार कमी झालाय पण पूर्ण संपलेला नाही) पण मग सदैव प्रवाहाच्या विरोधात वाहणाऱ्या आणि त्या तत्त्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या अशा निर्भीड आणि धाडसी तात्यारावांकडून परक्या देशात सुद्धा धिटाईने जगण्याची जणू नवीन उमेद मिळाली असं म्हणायला हरकत नाही.
आज एवढ्या सोयीसुविधा उपलब्ध असूनसुद्धा एवढ्या अडचणी येतात इथे आणि मन खायला उठतं कधीकधी आणि परत भारतात येण्याची इच्छा होते. १९०६ साली तात्यारावांनी बॅरिस्टर करण्यासाठी ती ४-५ वर्ष कशी काढली असतील आणि तेही अगदी जेमतेम पैशामध्ये कसं काय सगळं भागवलं असेल देव जाणे. हे सगळं असं जगताना प्राण तळमळणं स्वाभाविक आहे यात शंका नाही.
इकडे आल्यावर तात्याराव इंग्लंडमध्ये राहिलेले ते घर बघायची खूप इच्छा होती आणि आज त्यांच्या ५१व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून तिथे जाण्याचा योग्य सुद्धा जुळवून आणला. 65 Cromwell Avenue, Highgate, London N6 5HS हा त्या घराचा पत्ता. फारशी माहिती नसल्यामुळे आणि एकंदरच आज रविवार असल्यामुळे रस्त्यावर अगदी एखादा माणूस दिसत होता म्हणून तिथे पोचायला थोडा वेळ लागला. पण जेव्हा ती Blue Plaque बघितली ब्रिटिशांनी लावलेली तेव्हा अक्षरशः तात्यारावांनी या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठीच्या केलेल्या कार्याचं गांभीर्य डोक्यात लक्ख प्रकाश पाडून गेलं. त्यावर असं लिहिलंय "GREATER LONDON COUNCIL. VINAYAK DAMODAR SAVARKAR 1883-1966 Indian Patriot and Philosopher lived here". मी त्या घराचे २ फोटो आणि माझ्या इथल्या रूममध्ये लावलेला असे फोटो टाकतोय या पोस्ट सोबत. त्यात कळेल कि साधारण ६-७ पायऱ्या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजा आहे. तिथे पोचल्यावर मी त्या पायरीवर एक पुष्पगुच्छ ठेवला आणि डोकं टेकून नमस्कार केला आणि तात्यारावांच्या चरणस्पर्शाचा अनुभव घेतला तेव्हा स्वतःचाच अभिमान वाटला. मामाशी फोनवर बोलणं झाल्यावर १५ मिनिटे निस्तब्ध होऊन फक्त ती निळी पाटी बघत उभा होतो. डोक्यात विचारांचा काहूर माजलं होतं आणि त्यात भरीस भर म्हणजे तिथे १ ब्रिटिश कुटुंब आलं ७० ओलांडलेले आजी-आजोबा, त्यांचा मुलगा-सून आणि २ नातवंड. त्यातल्या आजोबांचं आणि माझं संभाषण मुद्दाम इथे सांगतो -
आजोबा - "Are you Indian?"
मी - "Yes, I am"
Where are you from?
मी - "I am from Maharashtra"
आजोबा - "Oh I see, looks like you're Marathi so we should speak Marathi, हो कि नाही"
हे ऐकल्यावर मला स्वतःला सावरायला क्षणभर गेला कारण ते पूर्ण कुटुंब शुद्ध मराठी बोलत होत माझ्याशी आणि त्याहून अभिमानाची गोष्ट म्हणजे तिथून पुढचा पाऊण तास आम्ही चक्क शुद्ध मराठीत गप्पा मारल्या आणि त्यातले ४० मिनिटं मी फक्त ऐकत होतो. त्यांनी स्वतःहून मला विचारला कि तात्यारावांच्या पुण्यतिथीमुळे आला आहेस का इथे? मी हो म्हणताच त्यांनी त्यांच्या हातातला पुष्पगुच्छ मला दाखवून आम्ही पण त्यासाठीच आलोय असं सांगितलं. विशेष म्हणजे ते गेले ५१ वर्ष न चुकता इथे येतायेत. सगळ्यांनी अगदी नातवंडांनी सुद्धा पायरीवर डोकं टेकून नमस्कार केला आणि आमचं बोलणं पुन्हा सुरु झालं. त्या कुटुंबाचा तात्यारावांबद्दलचा आदर आणि निष्ठा बघून मनापासून भारतीयांची किव आली. घराच्या बाहेर गर्दी बघून आतून एक ब्रिटिश बाई बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं कि सकाळपासून १०-१२ ब्रिटिश कुटुंब येऊन गेली पण मी पहिलाच आणि एकमेव भारतीय बहुदा तिथे भेट देणारा. त्यांनी विचारला तुम्हाला जर घर बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता आत येऊन (फोटो काढता आले नाहीत कारण त्यांनी तशी अट घातली होती) ते पूर्ण घर बघण्याची संधी मिळाली. मनापासून आनंद झाला. साला ज्या ब्रिटिशांविरुद्ध सावरकरांची लढाई होती ते सुद्धा नतमस्तक झाले त्यांचा चरणस्पर्श करण्यासाठी. सावरकरांनी लिहिलेलं सगळं साहित्य त्या आजोबांच्या घरात मराठी मध्ये उपलब्ध आहे आणि ख्रिस्ती असून सुद्धा ते रोज गीतेतले ५ श्लोक म्हणल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाहीत. मी त्यांचा फोटो काढायला गेलो तर त्यांनी मला सांगितलं आमचा फोटो काढण्यापेक्षा भारतातल्या प्रत्येक घरात सावरकरांचा फोटो लागेल यासाठी प्रयत्न करा तुम्ही सगळे भारतीय. निःशब्द झालो मी.
काय आपण कुठे आहोत? कधी कळणार आपल्याला सावरकरांची किंमत? भारत-पाकिस्तान, हिंदू-मुसलमान, ब्राम्हण आणि इतर समाज, आरक्षण, मोर्चे, निवडणुका, पक्ष, प्रचार, युती हे सगळं सोडून कधी बाहेर येणार आपण? आजपर्यंत गांधीमार्गाने क्रमणा करून घेतला ना आपण अनुभव? एकातरी दलित नेत्याने दुसरं पतितपावन मंदिर बांधलं का हिंदुस्थानात? तरीही सावरकर ब्राम्हणवादी.. हे जर असंच चालू राहिलं तर अखंड भारताचं स्वप्न भंगल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरंच आपल्याला आतातरी सावरकरांनी सांगितलेल्या तत्त्वांची अंमलबजावणी करायची नितांत गरज आहे. हे जर नाही केलं तर येत्या काही वर्षात भयाण परिस्थिती निर्माण होणार आणि त्यासाठी आत्तापासून मनाची तयारी करायला लागेल.
काही ज्या सहज शक्य आहेत त्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही -
१. आपल्या मुलांना Doremon बघायला जो काही वेळ देता त्यातले फक्त १५ मिनिटं अवांतर वाचन करण्यासाठी सावरकर उपलब्ध करून द्या. (मला इथे अगदी नमूद करावंसं वाटतंय कि माझी मामी सौ. Manjusha Kulkarni हिने नेहमीचं अशी पुस्तकं वाचण्याचा मुलांना आग्रह केला आणि त्याचा परिणाम आणि कालांतराने वागणुकीत झालेला बदल मी स्वतः अनुभवलाय)
२. सावरकरांचं साहित्य मिळत नाही/मिळालं तरी महाग आहे असली कारण यायला नकोत म्हणून इथे एक लिंक देतोय तिथे त्यांचा सर्व साहित्य मोफत PDF स्वरूपात मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये उपलब्ध आहे.
३. आपण आपल्याच महाराष्ट्रात मराठी बोलत नाही हे अगदी चुकीचं आहे म्हणून आज पासून रिक्षावाला, भाजीवाला आणि पाणीपुरीवाल्या भैया सोबत सुद्धा मराठीतच बोलायचं.
४. फक्त पैसे कमावून आणि डौलदार शरीर असून उपयोग नाही त्यात निर्भीडपणा किती आहे हे महत्वाचं. हे अंगिकारण्याचा प्रयत्न करूया आणि मग काही दिवसात आपल्याला स्वतःलाच बदल जाणवू लागेल.
या अशा काही सोप्या गोष्टी करून जेव्हा आपण सावरकरांचे विचार घराघरात पोचतील, त्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव झाल्यावर जेव्हा मन पेटून उठेल त्यादिवशी सावरकरांनी केलेल्या कष्टाचं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या वाताहतेचं चीज झालं असं म्हणता येईल.
इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की comment मध्ये कळवा. ब्रिगेडी आणि गांधीवाद्यांनी कृपा करून आपली अक्कल पाझळु नये. शुद्ध मराठीत अतिभयंकर अपमान करण्यात येईल. शुद्ध मराठी याकरता कारण इंग्लिश शिकायला तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींवर डोकं लावल्यामुळे वेळ झाला असेल असं वाटत नाही.
वंदे मातरम...!!!
अखंड हिंदुस्थान अमर रहे...!!!
-- संकेत बोपर्डीकर
लंडन