भारताचं राज – वैभव लेखांक ४५
गंगादेवी
डॉ. रमा गोळवलकर
विविध विषयांवर लेखन करणाऱ्या राज नरपुंगवांच्या मांदियाळीत लेखिका राजस्त्रियांचा
उल्लेख व्हायलाच हवा. म्हणून १४व्या शतकात होऊन गेलेल्या एका कवयित्री
राजमहिषीचा हा परिचय. एका पत्नीनं आपल्या पतीन गाजवलेल्या पराक्रमाची, त्यानं
अपूर्व मिळवलेल्या विजयाची इत्यंभूत घटना संस्कृत महाकाव्यात गुंफलेली आहे.
या राणीचं नाव आहे गंगादेवी आणि तिला तिची प्रजा गांगाम्बिका म्हणून संबोधते. ही
विजयनगर साम्राज्याचे संस्थापक बंधूंपैकी एक, बुक्करायांच्या मोठ्या मुलाची कुमार
कंपण्णाची पत्नी. कोण हे बुक्कराय? प्रत्येक राष्ट्रभक्ताला ज्यांचा इतिहास माहितच असायला
हवा असे दोघे पराक्रमी भाऊ दक्षिण भारतात होऊन गेले. अगदी थोडक्यात त्यांचा वृत्तांत
इथे जाणून घेऊ.
निलगीरीच्या डोंगराळ भागात वाडवडील संगम कुलातील मेंढपाळ म्हणून उपजीविका
करत असले तरी हरिहर उपाख्य हक्कराय आणि बुक्कराय दोघांना योद्धा होण्याची इच्छा
होती. म्हणून ते त्या काळात दक्षिण भारतातील एक अतिशय बलाढ्य साम्राज्य असलेल्या
वारंगळ (सध्या तेलंगण राज्य) च्या काकतीय राजवंशाच्या राजा प्रतापरुद्र राजाच्या सैन्यात
योद्धे म्हणून सहभागी झालेत. आपल्या कार्य कर्तृत्वावर सेनापती पदापर्यंत जाऊन पोहचले.
इ.स. १३२३ मध्ये मुहम्मद बिन तुघलकाविरुद्ध वारंगळच्या लढाईत झालेल्या दुर्दैवी
पराभवानंतर लुटलेल्या संपत्ती आणि बायकांसह (माल – ए – गनिमत = शत्रूचा लुटलेला
माल) या दोघांना गुलाम म्हणून दिल्लीला धाडण्यात आलं. तिथे त्यांना बळजबरीनं
मुसलमान करण्यात आलं.
इ.स. १३२३ ते १३३३ हा दहा वर्षांचा कालावधी दिल्ली सल्तनतीचे गुलाम सैनिक म्हणून
उत्तर भारतात लढाया लढल्यानंतर, त्यांना काहीसं स्वातंत्र्य मिळालं. संधी मिळताच त्यांनी
दिल्लीतून पलायन केलं आणि स्वामी विद्यारण्य सरस्वतींच्या पुढाकारानं इ.स. १३३४ मध्ये
पुन्हा सनातन धर्माचा अंगीकार केला. प्राचीन भारताच्या इतिहासातली ही बहुदा पहिली
घर वापसी होती. आणि स्वामींनी दिलेल्या प्रेरणेतून कर्नाटकात येऊन एक अतिशय
वैभवशाली राज्य स्थापन केलं – विजयनगर! आधी हरिहरराय प्रथमनं इ.स. १३३६ ते
१३५६ ही वीस वर्षं या साम्राज्याची धुरा वाहिली. त्यांच्या मृत्यूनंतर बुक्कराय सम्राट झाले.
इ.स. १३५६ ते १३७७ एकवीस वर्षांत अनेक लढाया आणि युद्ध लढत त्यांनी विजयनगर
साम्राज्याचा विस्तार दक्षिणेत थेट रामेश्वरमपर्यंत केला.
त्यांची मुले कुमार कंपण आणि हरिहर (द्वितीय) हेही पराक्रमाच्या बाबतीत आपल्या काका
आणि वडिलांचा वारसा पुढे चालवणारे. त्यामुळे त्यांनीही पित्याच्या सैन्याचं नेतृत्व करत
अनेक लढाया जिंकल्या. त्यापैकीच एक म्हणजे इ.स. १३७१ मध्ये मदुराईच्या
सुल्तानशाहीला पूर्णपणे पराभूत करणारं युद्ध. त्या युद्धात विजयनगर साम्राज्याच्या सेनेचा
कर्णधार होता कुमार कंपण्णा.
विजेत्या कुमार कंपण्णाची गृहलक्ष्मी म्हणजे आजची आपली कवयित्री गंगादेवी! ज्या
साम्राज्याची महाराणी काव्य शास्त्र विनोद जाणणारी असते ते साम्राज्य सांस्कृतिक आणि
शैक्षणिक दृष्ट्या किती संपन्न असेल याची कल्पना करा. राजमहिषी म्हणजे पट्टराणी
गंगादेवीचं माहेर तेलंगणाचं राजघराणं. म्हणजे तिची मातृभाषा तेलुगु होती. पण तिनं
काव्य मात्र संस्कृत भाषेतून केलं आहे.
या काव्याचं नाव आहे ‘मधुरा विजयम्’ किंवा ‘वीरकम्पराय चरित्रम्’. यात एकूण ९
अध्याय आहेत ज्यात सुरुवातीचे काही अध्याय हे सम्राट बुक्कराय आणि साम्राज्ञी देवयी
म्हणजे कवयित्रीचे सासूसासरे यांचा जीवन परिचय करून नंतर आपल्या पतीचा
कम्पण्णाचा जन्म वृत्तांत आहे. त्या नंतरच्या अध्यायांत त्याची जडणघडण कशी झाली हे
सांगून त्याचे गुणवर्णन आहे. त्यानंतर त्यानं जिंकलेल्या लढाया आणि केलेलं राजकारण याचं
विवरण आहे.
कम्पण्णारायानं दक्षिण भारत इस्लामी आक्रमकांच्या राजवटीतून मुक्त करण्याचं कार्य
अतिशय निगुतीनं पार पाडलं. त्यांच्या काळात पडलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार करणं, बंद
करून ठेवलेली मंदिरांची डागडुजी करून त्यात पूजाअर्चा पुन्हा सुरू करणं, या सगळ्या
मंदिरांच्या उत्पन्नाची वहिवाट पुन्हा सुरळीत करणं इत्यादी कामं त्यानं विनाविलंब
करण्याचा धडाका लावला. कांचीपुरंचं मंदिर पुन्हा सुव्यवस्थेत आणल्यानंतर
कम्पण्णारायाला साक्षात देवी कामाक्षीनं दृष्टांत देत तिचं खड्ग आशीर्वाद म्हणून दिला
असल्याचा प्रसंग या काव्यात अतिशय प्रभावीपणे रंगवण्यात आला आहे.
त्यानंतरच मदुराई म्हणजेच मधुरेचं मीनाक्षी मंदिर देखील परदास्यातून मुक्त करण्याची
मोहीम त्यानं हाती घेतली. मदुराईवर राज्य करणाऱ्या क्रूर, अत्याचारी मुसलमानी
राजवटीचा पूर्ण पाडाव करून तिथे पुन्हा सनातनी हिंदू राज्य स्थापन करण्यात आलं. या
सगळ्याचा काव्यबद्ध इतिहास म्हणजेच गंगादेवी रचित ‘मधुरा विजयम्’ किंवा
‘वीरकम्पराय चरित्रम्’.
सगळ्या घडामोडीत गंगादेवीनं आपल्या पतीसोबत सक्रीय सहभाग घेतला होता. तिनं
इतर महिलांना या अत्याचारी राजवटीविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. तिनं
घोड्यावर बसून खड्ग उपसून प्रत्यक्ष युद्धात पराक्रमही गाजवला होता. त्यामुळे या युद्धाची
एकूण एक घडामोड तिनं ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवली. प्रत्यक्ष अनुभवांना काव्यबद्ध
केलं असल्यामुळे हा त्या कालखंडाचा आणि त्या प्रांताचा इतिहास नोंदवलेला एक सबळ
पुरावा आहे.
मुख्य म्हणजे ‘हिस्ट्री ऑफ संस्कृत लिटरेचर’ या पुस्तकाचे लेखकद्वय सुशील कुमार डे
(१८९० – १९६८) आणि सुरेंद्रनाथ दासगुप्ता (१८८७ – १९५२) या काव्याविषयी
लिहिताना एक मुद्दा प्रकर्षानं मांडतात. ते म्हणतात – ‘या काव्यात ज्या कवींचा आदरपूर्वक
उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांचा काळ निश्चितच या कवयित्रीच्या आधीचा आहे हे सिद्ध
होतं. तसंच यात येणाऱ्या घटना, प्रसंग, व्यक्ती आणि तथ्य यांचा ताळमेळ मुहम्मद बिन
तुघलक बरोबर भारतात आलेला मोरक्कोच्या प्रवासी लेखकानं इब्न बतुतानं लिहून ठेवलेल्या
समकालीन नोंदींशी तंतोतत जुळतात. त्यावरून हे काव्य असलं तरी त्यात आलेल्या
तथ्यांचा कुठेही ऱ्हास किंवा विपर्यास केलेला नाही हेही स्पष्ट होतं.’
अर्थात या काव्याचा नायक म्हणजे कवयित्रीचा पतीच आहे आणि त्याचं वर्णन करताना
काही बाबतीत अतिशयोक्ती अलंकार वापरण्यात आलेला. पण त्या काळच्या भौगोलिक,
सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, संसाधनांविषयी यथार्थ वर्णन करण्यात आलेलं
आहे.
काव्यशास्त्राचे सगळे नियम तंतोतंत पाळून विदग्ध वैदर्भी शैलीत रचलेलं हे काव्य, विविध
ऋतूत आणि दिवसाच्या विविध प्रहरात दिसणाऱ्या निसर्गसौंदर्याचं अतिशय रसाळ वर्णन
करणारे श्लोक आहेत. आपल्या काव्याच्या सुरुवातीलाच ही कवयित्री कविकुलगुरु
कालिदासांना नमन करताना म्हणते -
‘दासतां कालिदासस्य कवय: के न बिभ्रति | इदानीमपि तस्यार्थानुपजीवन्त्यमी यत: ||’
(कोणते कवी कालिदासाचं दास्यत्व धारण करत नाहीत बरं? त्यानं लिहिलेल्या काव्यवर
आपली उपजीविका करणारे म्हणजे त्याच्या लेखनकार्यावर स्वत:च्या लेखनाची भूक
भागवणारे लोक आजही आहेत.)
या महान कवीनं प्रशस्त केलेल्या काव्य मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या अनेक कवींपैकी तीही
एक आहे असं म्हणायलाही ती विसरत नाही. तिच्यावर कालिदासाचा प्रभाव स्पष्ट
जाणवतो. कालिदासाच्या काव्यशैलीचा चांगलाच अभ्यास करून स्वत:च्या काव्यशैलीत
त्याचा प्रभाव तर जाणवू द्यायचा पण अभिव्यक्ती मात्र स्वतंत्रच असावी हा तिचा कटाक्ष
आहे. याचं उदाहरण म्हणजे हे हे दोन श्लोक आहेत. या पैकी पहिला कालिदासाच्या ‘रघुवंशा’
त राजा दिलीपाच्या गर्भवती पत्नीचं सुदक्षिणेचं वर्णन करणारा आहे.
‘शरीरसादादसमग्रभूषणा मुखेन सालक्ष्यत लोध्रपाण्डुना | तनु प्रकाशेन विचेय तारका प्रभात
कल्पा शशिनेव शर्वरी ||’ (शरीर कृश झाल्यामुळे जिने आपली आभूषणं काढून ठेवलेली आहे
ती लोध्रपुष्पाप्रमाणे फिकट कांतीची दिसत होती. जणू प्रकाश क्षीण झालेल्या चंद्रामुळे
तुरळक नक्षत्र दिसायला लागलेल्या मावळणाऱ्या मलूल रात्रीसारखी दिसत होती.)
तर दुसरा कवयित्री गंगादेवी चा - ‘स सेनां महतीं कर्षन् पूर्वसागरगामिनीम् | बभौ हर जटा
भ्रष्टां गङ्गामिव भगीरथ: ||’ (पूर्व दिशेने आपली सेना घेऊन जाणारा तो शंकराच्या जटेतून
खाली येणाऱ्या गंगेला (आपल्या मागे) घेऊन जाणाऱ्या भगीरथाप्रमाणे भासत होता.)
कालिदासाप्रमाणे चपखल उपमा देणं हे गंगादेवीचं मुख्य वैशिष्ट्य. यात राजाची उत्साहानं
फोफावत पूर्व दिशेला पुढे जाणाऱ्या सेनेला शंकराच्या जटेतून अनिर्बंध कोसळणाऱ्या गंगेची
उपमा गंगादेवी देते. या शिवाय दंडी, भवभूती सारख्या संस्कृत कवींच्या काव्यकर्तृत्वाचा
आदरपूर्वक उल्लेख करून बिल्वमंगल ठाकूर ‘लीलाशुक’कृत ‘कृष्ण करुणामृत’च्या काव्य
शैलीचीही स्तुतीही करते. याचा अर्थ या कवयित्रीनं या सगळ्या कवींच्या रचनांचा
व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यांच्या सगळ्या वैशिष्ट्यांचा समावेश आपल्या काव्यात
करण्याचा प्रयत्नही नक्कीच केला आहे.
गंगादेवी नंतर होऊन गेलेल्या संस्कृत कवींनी तिच्या काव्यप्रतिभेची भरभरून स्तुती केली
आहे. तर काहींनी तिच्या काव्याला प्रमाण मानून त्यासारखी रचना करण्याचा प्रयत्न
केल्याचं दिसतं. उदाहरणार्थ सुमतीन्द्र मठाचे मठाधिपती मध्वाचार्य, राघवेंद्रस्वामीन् यांच्या
कार्याचा गौरव करणारं नारायण कवी रचित राघवेंद्रविजय या १७ व्या शतकात रचलेल्या
काव्यावर ‘मधुरा विजयम्’ किंवा ‘वीरकम्पराय चरित्रम्’ च्या काव्यशैलीचा थेट प्रभाव
असल्याचं दाक्षिणात्य संस्कृत विद्वानाचं मत आहे.
इ.स. १९१६ मध्ये, या काव्याचं भूर्जपत्रावर लिहिलेलं एकसष्ट पानांचं एक हस्तलिखित
तिरूअनंतपुरंच्या पंडित श्री एन रामस्वामी शास्त्रींच्या संग्रहालयात सापडलं. जवळपास
पाचशेच्या वर श्लोक असलेल्या या हस्तलिखित काव्याची अवस्था अतिशय जीर्ण होतीच
शिवाय त्याची पानं देखील मागे पुढे लागलेली. आणि ते आणखी एका हस्तलिखिताच्या
पानांत मिसळलेलं अशा अवस्थेत सापडलं. त्यातले शेवटचे काही श्लोक गहाळ झालेले होते.
त्यावरूनच जी. हरिहर शास्त्री आणि व्ही. श्रीनिवास शास्त्रींनी त्याची संशोधित आवृत्ती
सिद्ध करून त्याचं छापील पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं. आणि तेच सध्या उपलब्ध आहे.
नंतर तिरूअनंतपुरंमध्येच आणखी दोन आणि लाहोरमध्ये एक अशी तीन हस्तलिखितं
सापडली असल्याची नोंद आहे.
तर अशी ही योद्धा – विदुषी – कवयित्री गंगादेवी उपाख्य गंगाम्बिका म्हणजे प्राचीन
भारतीय संस्कृतीतील बहुविधा स्त्री शक्तीचं मूर्तिमंत उदाहरणच आहे.