Monday, April 5, 2021

संकेत कुलकर्णी (लंडन) गोडसे- गांधी

 ३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाली. जगभरातून शोक व्यक्त झाला. हत्या करणाऱ्यांना अटक झाली. खटला चालला. शिक्षा सुनावली गेली. आणि त्याची अंमलबजावणी म्हणून फाशीही झाली. 

ह्याच संदर्भात गांधीहत्येच्या खटल्याचे कागदपत्र वाचताना नथुराम गोडसेंच्या जबानीत मला असा एक एक उल्लेख आढळला की, “...जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी सुरु केलेला उपवास सोडण्यासाठी त्यांनी ज्या ७ अटी ठेवल्या होत्या त्या सर्व हिंदूविरोधी होत्या...” मला खूप विचार करूनही ह्या नेमक्या अटींपैकी एकही आठवली नाही. थोडंफार शोधूनही कुठेच काही मिळालं नाही. आपल्याला शाळेत (किंवा ‘सरकारी’!) इतिहास सांगताना ह्या अटी नेमक्या काय होत्या हे कधीच सांगितले गेले नाही. जानेवारी १९४८ मध्ये गांधी हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी उपासाद्वारे प्रयत्न करत होते वगैरे वरवरचे उल्लेखच सगळीकडे आहेत. अनेकांनी ते वाचलेही असतील. मग गोडसेंनी त्यांच्या जबानीत असं का सांगावं की त्या सर्व अटी हिंदूविरोधी होत्या? अश्या काय अटी होत्या त्या?

ब्रिटीश लायब्ररीत जुने न्यूजपेपर आर्काईव्झ शोधणं सुरु केलं. १९६६ पासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणारे ज्येष्ठ इतिहाससंशोधक आणि लेखक डॉ वासुदेव गोडबोलेही योगायोगाने नेमका हाच संदर्भ बराच काळ शोधत आहेत असे समजले. 

मग त्याच सुमाराचे सहज कुतूहल म्हणून बाकीचे जुने इंग्रजी न्यूजपेपर्स शोधायला सुरुवात केली. १९ जानेवारीच्या ‘डर्बी इव्हिनिंग टेलिग्राफ’ ह्या वर्तमानपत्रांत गांधींनी उपास सोडल्याची बातमी दिसली आणि सोबत हापण उल्लेख दिसला की त्या सात अटींपैकी एक अट ही होती की सप्टेंबर १९४७ च्या दंग्यानंतर दिल्लीतल्या ज्या ११७ मशीदी ज्यांची (हिंदू आणि शीखांनी) देवळं किंवा घरं बनवली होती त्यांच्या पुन्हा मशीदी बनवण्यात याव्यात. हे वाचून मला नाही म्हटलं तरी धक्काच बसला. एकतर कोणत्याही  भारतीय पेपरमध्ये ह्यातले कोणतेच उल्लेख नसावेत आणि ह्या सात अटी जर सगळ्याच अश्याच असतील तर मग?

हा शोध आता सोडून द्यावा असा विचार मनांत येत असतानाच ‘द यॉर्कशायर पोस्ट’ चा १९ जानेवारी १९४८ चा अंक पहाण्यात आला आणि त्यात ह्या ७ अटी एकदाच्या मिळाल्या. काय होत्या बरं ह्या अटी? खाली मी त्या अटी देतोय. हा अटींवरून ह्या अटी खरंच गोडसेंनी सांगितल्याप्रमाणे हिंदूविरोधी होत्या का हे ज्याचं त्याने ठरवावं. गांधींचे विचार चूक किंवा बरोबर हे ज्याचं त्याने ठरवावं. माझं मत मी सांगणार नाहीये. 

अट १ - दिल्लीजवळच्या मेहरौली येथे मुसलमानांना त्यांचा उरूस साजरा करायची परवानगी असावी. (मेहरौलीत ख्वाजा कुतुबुद्दीनची मशीद होती. दंग्यांत त्याची मोडतोड झाली होती. हिंदू आणि शीखांनी त्याच्या आजूबाजूच्या मुसलमानांना हाकलून लावलेले होते. ह्या ख्वाजा कुतुबुद्दीनचा उरूस २६ जानेवारी १९४८ रोजी व्हायचा होता. पण तो करताना त्यात अडथळे येण्याची शक्यता होती. गांधींना हे नको होते.)

अट २ - दिल्लीतून पळून गेलेल्या मुसलमानांना सुरक्षितपणे परत येऊ द्यावे. 

अट ३ - दिल्लीतल्या ज्या ११८ मशीदींची देवळे बनवण्यात आलेली आहेत त्या मशीदी पुन्हा मुसलमानांना देऊन टाकण्यात याव्यात. 

अट ४ - संपूर्ण दिल्ली मुसलमानांसाठी सुरक्षित बनवण्यात यावी. 

अट ५ - रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मुसलमानांच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी. 

अट ६ - हिंदू आणि शीखांनी मुसलमानांवर टाकलेला आर्थिक बहिष्कार मागे घेण्यात यावा. 

अट ७ - दिल्लीत उरलेले काही मुस्लिम वस्त्यांचे भाग पाकिस्तानातून आलेल्या हिंदू किंवा शीख निर्वासितांनी वापरू नयेत. 

सोबत ह्या सगळ्या कात्रणांचे फोटोही पहाता येतील. जाताजाता रामायणातल्या एका श्लोकाची मात्र नक्की आठवण करून देऊ इच्छितो:

मरणान्तानि वैराणि निवॄत्तं न: प्रयोजनम् |

क्रीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव || (रामायण ६ - १०९ - २५)

इत्यलम्!

- संकेत कुलकर्णी (लंडन)


फोटो: ‘टाईम्स ऑफ इंडीया’ १९ जानेवारी १९४८ ज्यात फक्त ७ अटींचा उल्लेख आहे.


१९ जानेवारी १९४८ मधला ‘डर्बी इव्हिनिंग टेलिग्राफ’.


‘द यॉर्कशायर पोस्ट’ चा १९ जानेवारी १९४८ चा अंक आणि त्यातल्या ७ अटी.

No comments: